Sunday, 4 March 2018

77 मायबोली मराठीसाठी लेखन - विचार, अभ्यास, विश्लेषण आणि बरच काही.

   
"लक्षात ठेवा भाषेचा अंत म्हणजे लोकसंस्कृतीचा / समाजाच्या मूलभूत / परिवर्तनाचा / शिक्षणाचा / इतिहासाचा / लोककलेचा अंत आहे, दैनंदिनी सामाजिक वापरात सोप्या पाणचट / ढोबळ शब्दांचा वापर करणे म्हणजे मराठीच्या समृद्धीचा अपमान करणे होय "
मराठी भाषा दिन जगभर साजरा होत असतांना महाराष्ट्र शासनाने ( सध्याचे भाजप सरकार ) १३१४ मराठी शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. एकीकडे मराठीचा भाषेचा अभिमान व अस्मिता बाळगण्याची गप्पा करण्याऱ्या या शासनाला ग्रामीण भागातील विद्यार्थी शिक्षणापासून दूर जाईल याची काळजी नाही. भाजप सरकार निढोर वृत्तीप्रमाणे मराठी माणसासाठी काम करत आहे? त्यात आपले "तावडे" शिक्षण मंत्री ह्या अडाणी नेत्यासारख्या गोष्टी, इंग्रजी शाळा, कॉर्पोरेट शिक्षण, हिंदीचा वाढता प्रभाव...ह्या आणि अश्या अनेक गोष्टी आपल्या पुढच्या पिढीच्या अंगलट येणार आहे हे नक्की...मला भीती वाटत आहे, हो मी खूप घाबरलो आहे... घामाघूम झालो आहे.. माझ्या डोळ्यात पाणी येत आहे... भावनिक होऊन खूप विचारात पडलो आहे मी... कारण मागच्या वर्षीपासून मला जाणवत आहेत आपल्या शिक्षण पद्दतीच्या आणि राजकारणाच्या घोडचुका... त्याचे परिणाम खरच दूरगामी होतील हे मला दिसत आहे....!
आपल्याला आमोद आणि प्रमोदत अंतर्मुख होवून विचार करण्याची वेळ आली आहे कि मराठी भाषेची नक्की स्थिति काय आहे ?? मराठी भाषा दर ५० किलोमीटर अंतर गेल्यावर बदलत ( स्वर / आवाज चड - उतार ) असते. पण आपलीच मराठी बरोबर आणि दुसऱ्याची चुकीची ह्या वादात आपण बराचसा वेळ वाया घालवत आहे. पुण्यात शुद्ध मराठी बोलतात हा एक गैरसमज आहे. मुळात शुद्ध अशुद्ध असं काहीच नसतं / नाही. शुद्ध मराठी ते बोली भाषेतील मराठी ह्या प्रवासात पण मराठी भाषेने आपला आत्मा जिवंत ठेवायला पाहिजे. मराठी भाषेमधे सांस्कृतिकपणा आहे म्हणून बहुतांशी मराठी माणुस हा सांस्कृतिकपणाची जाण असणारा आहे हे तुम्हाला इतर राज्यात गेल्यावर समजुन येइल. आपल्या इतिहासा बद्दल जेवढा अभिमान हा मराठी माणसाला आहे तेवढा कदाचित इतर राज्यांना असेल. " जय महाराष्ट्र" ! हे स्फूर्तिवचन हे इतर कुठले पण राज्य त्यांच्या राज्यबद्दल वापरत नाहीत आणि ह्या घोषने मधे फक्त प्रमाणिक/ कट्टर मराठी प्रेम व्यक्त होते. मुग़ल असो नाहीतर ब्रिटिश यांविरुद्ध मराठी रक्त लढ़ण्यात नेहमी अग्रेस्सर राहिले आहे. ह्या भाषेने जागतिक विचारवंत / नामवंत दिले आहेत.
मराठी साठी ह्या सध्या सोप्या कृती खूपच गरजेच्या आहेत:-
- मराठी भाषा जनजागृती करायला हवी, मराठी भाषा जास्तीत जास्त वापरण्यासाठी आपल्या
मुळाकडे लक्ष देणे गरजेचे आहे. मूळ म्हणजे मानसिकता आणि विचार होय.
- मराठी चित्रपट सृष्टी संपत ढोबळ सिनेमे प्रदर्शित करत आहे.
- मराठी माणूस सकाळ पासून रात्री झोपेपर्यंत एकप्रकारे विष ओकल्यासारखे कानात इंग्रजी आणि हिंदीचे शब्द साठून ते परिपक्क होत आहेत.
- मराठी चॅनेल कार्यक्रम ( सीरिअल ) ( मराठीत काय म्हणतात त्यांना ?) त्यातून आज एक
दळभद्री आणि कफल्लक प्रबोधन मराठी माणसांपर्यंत पोहचत आहे.
- मोठ्या लोकसंखेच्या शहरातून बोली भाषा बहुदा हिंदी आणि इंग्रजी का होत आहे? ते कमी करण्याचे उपाय आणि कृती करणे गरजेचे.....
- शिक्षण व्यवस्थामध्ये आमूलाग्र बदल करणे गरजेचे त्यासाठी मोठ्या संघटनांनी हे मनावर घेतले
पाहिजे.
- साहित्यिक, लेखक , वक्ते, सिनेमे कलाकार, चळवळीचे पण सत्तेत नसलेले लेखक आणि महत्वाचे म्हणजे उद्योजक यांनी यामध्ये पुढाकार घेण्याची वेळ आली आहे.
- सत्तेत असलेले राजकारणी हिंदी / इंग्रजी वापरण्यास पुढाकार घेतात त्यावर कडक उपाय आजच्या युवकांनी करायला हवेत.
- सध्याच्या आधुनिक विश्वात / नवनव्या तंत्रन्यानाच्या जगतात १२ ते १५ कोटी मराठी
भाषिकांनी मनावर घेतलं तर अनेक देशात मराठी अलौकिक होईल अभिजात मराठी.
- अभिजात मराठीसाठी एकत्र येणे अत्यंत गरजेचे... युवकांना अभिजात म्हणजे काय माहित नाही.. त्यावर उपाय केले पाहिजेत..
माझ्या पिढीला इतका संघर्ष का करावा लागत आहे ? आम्ही देश कधी घडवायचा ? संशोधन ? नवीन संगीत क्षेत्र ? शिक्षणात परिवर्तन कधी आणायचे ? भष्ट्राचार कधी थांबवायचा ? कडक कायदे विकसित / दुरुस्त कधी करायचे ? आर्थिक / सामाजिक / सांस्कृतिक आणि कला क्षेत्र कुठे आहे ते कधी / कसे विकसित करायचे ??
तुम्हाला माहित आहे का कि इमारत ढासळत चालली असेल तर त्याचा पाया खराब असतो. आपला पाया "अज्ञान" आहे. अज्ञानामुळे आज आमूलाग्र बदल झाले आहेत. अज्ञानांमुळे साहस कमी झालं आणि हि वेळ आमच्या पिढी वर येत आहे. मग त्यात जात / धर्म / भष्ट्राचार वैगेरे चा भडीमार आलाच.. ते काहीही असो मी माझ्या मराठी भाषासाठी माझ्या लेखणीतला / साहित्यातला मोठ्ठा भाग राखून ठेवत माझ्या कार्याची सुरवात केली आहे.
जगात भारत इंग्रजीचा वापर करण्यात दुसऱ्या क्रमांकावर आहे, भारी आहे खूप हि गोष्ट .
मला / आम्हाला माझ्या मातृभाषेची कक्षा विस्तृत करायची आहे. त्यासाठी मी तयार होत आहे आणि तुम्हीही आपल्या भाषेचं असलेले ऋण विसरता काम नये. लांबच जाऊदे त्या तामिळनाडू राज्याचा थोडं आढावा / अभ्यास / विश्लेषण करा तुम्ही कळेल मग आपण कोठे आहोत.
हा लेख एक प्रकारे चळवळ वाटते मला स्वतःला जी ह्या दशकात खूप विस्तारेल...येणाऱ्या दिवसात मराठी माणसाला त्याच्या बुद्धीला ज्ञानरूपी मायबोलीचे खाद्य मिळो, इतर राज्याचं भाषेविषयी प्रेम कट्टरपणा कळों आणि हि सर्वात श्रीमंत समृद्ध मराठी भाषा अशीच वाढत राहो ह्यासाठी शुभेच्छा सर्वाना देतो. लेखात अनेक मुद्दे नाही घेतले. जस कि संमलने / महाविद्यालयीन वातावरण / मराठी लेखक वैगेरे यांच्यावर पुढच्या लेखात मी लिहेन....
राजभाषा दिवसाच्या ( दिन?) शुभेच्छा...
आकाश आलुगडे, मायबोली मराठीसाठी लेखन - विचार, अभ्यास, विश्लेषण आणि बरच काही..२७/०२/२०१८

76 स्मशानभूमी सफर शिकवण - १

आमच्या दोघांच्या हातात चहाचे कप होते, १५ मिनिटे झाले असतील आम्ही गप्पा मारत होतो..... मी माझ्या विदेशी गुंतवणूक आणि मिळालेल्या परताव्या बद्धल त्यांना माहित देत होतो.... ते मला खूप प्रोत्सहीत करत त्यांच्या शब्दांद्वारे माझा सन्मान करत होते ...... अचानक ते माझ्या स्मशानभूमी सफर लेखावर बोलू लागले...!
"तुझा समशानभूमीचा लेख मी वाचला आकाश" ,तू खूप वेळा तिथे जाऊन आला आहेस."
"हो...." मी म्हणालो.
"तुझा लेख वाचून मी खूप काही शिकलो, वास्तव स्पष्ट अनुभवलं... तुला का जाणीव होत आहे कि स्मशानात काही तरी आहे ? ते उतरले...
"माहित नाही सर ! खूप काही आहे तिथे... माझ्या आत्म्यातील चैत्यन्य तिथे जाऊन उमलत आहे. 'माझ्या आतील असणाऱ्या काही घटकांचा जन्म होत आहे' असं वाटत तिथे गेल्यावर... मी तो चहाचा कप ठेवत म्हणालो...
'मग तू पुन्हा जाणार असशील.....आणि पुन्हा लेख लिहशील, हे नक्की' त्यांनी विचारलं.
"हो, मी पुन्हा जाणार आहे आणि ह्या वेळी वेगळं काही तरी करेन...".
'जळालेल्या राखेपासून आणि संपलेल्या त्या देहापासून तुला मृत्यूच्या शृंखलेवर विजय मिळवायचा होता असं मागच्या लेखात वाचलं होत, हे अचानक का घडलं तुझ्याबाबतीत ? म्हणजे तुला कस सुचलं हे ? अगदी गुंतवणूक, शिक्षण, आयात निर्यात लेख लिहणारा तू ह्या विषयाची ओढ कशी लागली ?' ते चहाचा शेवटचा घोट घेत म्हणाले.
"माहित नाही.. खरच मी असं का करत आहे?, अनेक जण विचारत आहेत.... अंतर्मनातून ह्या सर्व कृती उमलत आहेत". माझा एक वेगळा प्रवास सुरु झाला आहे सर, असं मला वाटत."
"आकाश तुझे कौशल्ये वाढत आहेत. तू वेगळा ठरत आहेस... " ते म्हणाले.
सर मानवी मनात अफाट शक्ती असते. आत्मिक आणि आध्यत्मिक समृद्धी मला मिळवायची आहे त्यासाठी मी हा प्रवास करत आहे. कुठे पोहचेन माहित नाही." मी म्हणालो..
नंतर काही मिनिटे आम्ही इतर विषयांवर चर्चा केली .. त्यानंतर मी त्यांचा मी निरोप घेतला.. त्यांच्या घराबाहेर पडत असताना माझं चप्पल घालत असताना मी विचारत होतो.." माझ्या लेखाने इतके का विचार करत आहेत सर्व जण? .. अजून आपल्या समाजात अश्या हजारो गोष्टी आहेत ज्या बोलल्या / विचार केला जात नाही. लपवल्या जातात, दडपलेल्या आहेत... !
मनातल्या मनात ठरवलं... आता येणाऱ्या दिवसात खूप काही करायच.....
आज आपल्यात अशी माणसे आहेत ज्यांच्याकडे अनेक गुण वैशिष्ट्ये आहेत. अंगी कला आहे. जगण्याची उमज आहे. पण ते आज कश्याप्रकारे जगत आहेत? आपलं अमूल्य आयुष्य व्यर्थ घालवत आहेत. त्यांच्या इच्छेनुरूप न जगता ते अफाट नियमात बंदिस्त प्रमाणे जगत आहेत..!
माझ्या अनुभवत अश्या अनेक गोष्टी आहेत ज्या मृत्यूच्या शय्येवर त्या व्यक्तींच्या जीवनाचा आढावा त्यांच्यासोबत मी घेतला आहे आणि मी अनेकांना त्यांच्या शेवटच्या घटका मोजत तडपडत जीव सोडताना पाहिलं आहे. जर त्या गोष्टी तो अनुभवलेला प्रसंग मी तुम्हाला सांगितल्या तर खरच तुम्ही कोणाला तरी मिठीत घेऊन खूप रडाल'.. याची मला खात्री आहे.
मानसिक ताण तणाव आणि चिंता करणे म्हणजे जिवंतपणी मृत्यू होय. लहानसा आयुष्य इच्छेनुसार जगता येत....अंतर्मनातून येणाऱ्या आवाजकडे लक्ष द्या.... मानसिक, भावनिक आणि अध्यात्मिक वाटचाल चला...हे एकप्रकारे शिक्षण आहे असं मी म्हणेन कारण शिक्षण म्हणजे मनुष्यतील पूर्णत्वाचे प्रकटीकरण , मानसिक शक्तींचा विकास करणे अस स्वामी विवेकानंद यांनी म्हंटल आहे. निसर्गतः प्रत्येकातच ज्ञान अंतर्गत असते शिक्षण म्हणजे पूर्णत्वाचे प्रकटीकरण आहे. ते बाहेर काढणे म्हणत्वाचे होय .
आपण जीवनाला एक विशिष्ट्य जीवनदृष्टीने पाहतो. खरे तर जीवनाला आपल्याला चहुबाजीनी समजून घेता आले पाहिजे. आणि हा एक नवीन जीवनमूल्ये ठरेल असं मला वाटत.
"आयुष्याचा शेवट म्हणजे मृत्यू नाही....! जिवंत असताना आपले विचार / आपले गुण / आपली स्वप्ने / आपल्या इच्छा आकांशा मारणे म्हणजे मृत्यू होय." ही 'महत्त्वाची शिकवण' मला आली त्या पहिल्या सफर मधून...
शेवटी..... स्मशानभूमीच्या पहिल्या लेखातून मला अनेक फोन, मेसेज, स्तुती, प्रेम, सल्ला आणि मित्र मिळाले त्या सर्वांचा मी हृदयापासून ऋणी राहीन सदैव.......

लवकरच भेटू स्मशानभूमी सफर - २ मध्ये....... 
आकाश आलुगडे, स्मशानभूमी सफर शिकवण - १ , २ मार्च २०१८.

Wednesday, 21 February 2018

75 `टू किल अ मॉकिंग बर्ड’


`टू किल अ मॉकिंग बर्ड’ ही हार्पर ली यांची कादंबरी काही जणांच्या म्हणण्याप्रमाणे जगातिल सर्वाधिक विकले गेलेले पुस्तक आहे. अगदी बायबलपेक्षही याच्या जास्त प्रती प्रकाशित झाल्या आहेत. सुमारे चार कोटी वगैरे प्रती प्रकाशित झाल्याची अधिकृत आकडेवारीच आहे. अनधिकृतरित्या जगभरातील फूटपाथांवर हे पुस्तक किती विकले गेले असेल याची कोणीही कल्पना करू शकत नाही. अमेरिकेत हे पुस्तक गेली चार दशके शालेय अभ्यासक्रमात लावले गेले आहे. १९३५ साली आलेल्या जागतिक महामंदीच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेतील अलाबामा राज्यातील एका विधुर वकिलाच्या कुटुंबाची ही कहाणी आहे. अमेरिकेतील वर्णद्वेष हा या कादंबरीचा गाभा आहे. त्यामुळेच शालेय अभ्यासक्रमातच हे पुस्तक अमेरिकी विद्यार्थ्यांच्या वाचनयादीत लावलेले असते. वर्णद्वेषाचे विष आजही अमेरिकेत तितकेच अनेकांच्या नेणीवांचा ताबा घेऊन असले, तरीही अमेरिकी शासनसंस्था ही अजूनही भक्कमरित्या सेक्युलॅरिजमच्या पायावर उभी आहे. नेमका हाच सध्याच्या अमेरिकी राष्ट्रपतींच्या मार्गातला मुख्य अडसर असावा. त्यामुळेच कदाचित इयत्ता आठवीच्या वर्गातील मुलांच्या वाचनयादीत असलेले हे पुस्तक मिसिसीपी राज्यातील बिलोक्सी शहराच्या शाळेने वाचन यादीतून काढून टाकले आहे. मात्र या शाळेने घेतलेल्या या निर्णयाचे जोरदार पडसाद अमेरिकेत उमटत आहेत. अगदी रिपब्लिकन पक्षाचे सिनेटर बेन सास यांनी याच्या विरोधात जोरदार प्रतिक्रिया दिल्या आहेत. ट्विटरवरून प्रतिक्रिया देताना सास यांनी म्हटले आहे की, “टू कील अ मॉकिंग बर्डसारखे पुस्तक बिलोक्सी येथील शाळेने वाचन यादीतून काढून टाकणे याचा अर्थ आपल्यासमोर नक्कीच काही तरी समस्या आहे. या शाळेतील विद्यार्थ्यांच्या पालकांनी या शाळेच्या प्रशासनाला हे थेट सांगायला हवे की, आमची मुले इतकी प्रगल्भ नक्कीच आहेत की, ती हे पुस्तक वाचू शकतात.’’


अवतारसिंह पाश

आपल्याकरिता अशा प्रकारे पुस्तकावर प्रतिबंध घालणे वगैरे घटना काही नव्या नाहीत. सध्याच्या काळात तर बिलकूलच नाहीत. अगदी काही दिवसांपूर्वीच पंजाबी कवी अवतारसिंग पाश यांच्या `सबसे खतरनाक होता है’ या कवितेला ११वीच्या अभ्यासक्रमातून काढून टाकण्याचा सल्ला परिवारातील एक शिक्षण तज्ज्ञ दिनानाथ बात्रा यांनी दिलेलाच आहे. पुस्तक तर दूरची गोष्ट आहे. ज्या सोशल मिडियाचा वापर करून व प्रतिस्पर्धी पक्षांवर तुफान चिखलफेक करत सत्तेचा सोपान यशस्वीरित्या चढण्याचा भाजपचा प्रयत्न यशस्वी ठरला, त्याच सोशल मिडियावरून आता सत्तेत आल्यानंतर त्यांच्यावर जोरदार टीका होऊ लागल्यामुळे सोशल मिडियावर नियंत्रण कसे आणता येईल, याचा सत्ताधाऱ्यांमध्ये जोरदार खल सुरू आहे.
अमेरिकाही ट्रम्प यांच्यासारखी व्यक्ती राष्ट्रपती पदावर बसल्यापासून अनेक आवर्तनांमधून जात आहे. काळ्यांचा द्वेष हा तर अमेरिकी नेणीवेत वर्षा नु वर्षांपासून आहे, असे माल्कम एक्सच नव्हे, तर अनेक श्वेतवर्णीय समाजशास्त्राचे अभ्यासकही मान्य करतात. ९/११च्या हल्ल्यानंतर छोटे बूश यांनी वॉर ऑफ बेबीलॉन म्हणत ज्या प्रकारे या युद्धाला धर्मयुद्धाचे वळण देण्याचा प्रयत्न केला त्यानंतर सर्वसाधारण अमेरिकी नागरिकांच्या मनात मुस्लिमांविषयीही तशाच प्रकारचा द्वेष भिनल्याची अनेक उदाहरणे आपल्याला पाहायला मिळतात. मात्र असे असले तरी अमेरिकेतील लोकशाही राज्यव्यवस्थेने उभ्या केलेल्या शासन संस्थेची अनेक अंगे ही पक्षपाती झालेली नाहीत. त्यामुळेच तर उजव्या बाजूला झुकलेल्या रिपब्लिकन पक्षातूनही ट्रम्प यांच्या वर्णद्वेषी भूमिकेला विरोध होतो. आपल्याकडे पाशवर बंदी आणल्यानंतर भाजप तर सोडूनच द्या मात्र सेक्युलॅरिजमचा पेटेंट कायम स्वतःच्याच ताब्यात असल्याचा आव आणणाऱ्या काँग्रेसच्या तरी एखाद्या नेत्याने त्याबाबत काही भूमिका घेतल्याचे आपल्याला स्मरते आहे का? सध्या योगायोगाने का होईना पंजाबमध्ये काँग्रेसचेच राज्य आहे. मात्र यावर पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदरसिंग यांनीही तोंडातून ब्रदेखील काढल्याची बातमी कुठेही आल्याचे दिसलेले नाही. अमेरिकेत एफबीआयसारख्या संस्थेचा प्रमुख थेट राष्ट्राध्यक्षांच्या विरोधात उघड भूमिका घेऊ शकतो. क्लिंटन बाईंच्या खाजगी इ-मेल सरकारी कामाकरिता वापरल्याच्या प्रकरणात त्यांना तुरुंगात धाडू, असे ट्रम्प यांनी निवडणुकीपूर्वी जाहिर केलेलं असताना या प्रकरणात देशद्रोहासारखं काही गंभीर नसल्याचा हवालाही हीच एफबीआय ट्रम्प राष्ट्रपती झाल्यानंतर देते. आपल्याकडील सीबीआय किंवा तत्सम संस्था अशा वागत आहेत, असं स्वप्नदेखील आपल्याला पडू शकतं का? सध्या तर उन्मादाचा कहर इतका टोकाला आहे की, देशातील जनतेने निवडून दिलेल्या पंतप्रधान मोदींच्या विरोधात बोलणे म्हणजे देशद्रोहच आहे, असे केवळ मोदींच्या मंत्रिमंडळातील मंत्री, आणि भाजपचे नेते-कार्यकर्ते, किंवा त्यांचे भक्तगण यांनाच वाटते असे नाही, तर इंदिरा गांधींनी लोकशाही पायदळी तुडवल्याचा साक्षात्कार ज्यांना पदोपदी होत असतो, असे विविध क्षेत्रांमधील तज्ज्ञही अशी भूमिका उघड घेताना दिसतात. अशा वातावरणामुळेच तर मग कन्हैया कुमार आणि हार्दीक पटेलसारख्या तरुणांच्या जाहीर मोदीविरोधी भूमिकांची तात्काळ `दखल’ घेऊन शासनसंस्था त्यांना थेट तुरुंगात टाकते आणि त्यांच्यावर देशद्रोहाचे खटलेही लादते.
टू कील अ मॉकिंग बर्ड या पुस्तकावर ही काही पहिल्यांदा बंदी आली आहे, अशातलाही भाग नाही. या पुस्तकातील भाषेवर व पुस्तकांतील काही व्यक्तिरेखांच्या तोंडी असलेल्या संवादांवर यापूर्वीसुद्धा अनेकांनी आक्षेप घेतलेले आहेत. पुस्तकात काळ्यांना निग्रो असं संबोधलेलं आहे. सुमारे पन्नासएक वेळा निग्रो हा शब्द या कादंबरीत येतो. निग्रो हा शब्द हा अफ्रिकी अमेरिकनांकरिता शिवीसारखा वापरला जाणारा शब्द असून त्या शब्दावर औपचारिकरित्या बंदी आहे. मात्र एखादं वास्तव कथेतून, कादंबरीतून अथवा कविता किंवा चित्रातून दाखवताना कलाकाराला याचं स्वातंत्र्य आहे किंवा नाही, हा खरा प्रश्न आहे. तसं ते नसेल तर मग केवळ निग्रो हा शब्दच का, आी-बहिणीवरून सर्रास वापरल्या जाणाऱ्या शिव्या, बलात्कारासारख्या सिनेमांमधून दाखविल्या जाणाऱ्या घटना या सगळ्यांवरच बंदी आणावी लागेल. कलेच्या माध्यमातून सांप्रत समाजाचं वर्णन असं सरकारी भाषेत करायला लागलं तर तो सर्जनशीलतेप्रती मोठाच विनोद होईल. अमेरिकेतील मिसिसीपीसारख्या राज्यामध्ये तर वर्णद्वेषाचे हे विष खूप खोलवर भिनलेले आहे. त्यामुळे या राज्यात राहणाऱ्या व विशेषतः आंतर्वर्णिय पालकांनीदेखील याबाबत अनेकदा असे आक्षेप घेतल्याचे न्यू यॉर्क टाइम्सचे म्हणणे आहे. व्हर्जिनिया या आणखी एका वर्णद्वेष अधिक खोलवर रूजलेल्या राज्यातही गेल्या वर्षी हे पुस्तक ग्रंथालयातून काढून टाकण्याचा निर्णय घेण्यात आला होता.
या पुस्तकातील काही वाक्ये वर्णद्वेषी असल्याचा आरोप करत शाळा प्रशासनाने हे पुस्तक काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे. हे म्हणजे अगदी तंतोतंत आपल्या देशातील उदारमतवादी परंपरा नष्ट करण्यासाठी फॅसिस्ट शक्ती ज्या प्रकारच्या क्लृप्त्या वापरतात तोच हा प्रकार आहे. साधारण वर्ष दीड वर्षापूर्वी वसंत दत्तात्रय गुर्जरांच्या गांधी मला भेटला या पोस्टर कवितेवरूनही असंच वादळ उठलं होतं. गांधीहत्येचं उघड समर्थन करणारे तेव्हा म्हणत होते की, यात गांधीजींची बदनामी केली आहे. वास्तविक पाहता कविता गांधींच्या बाजूने असतानाही त्यातील कल्पनांचे अन्वयार्थ शब्दशः लावून हा आरोप जाणीवपूर्वक केला जात होता. या पुस्तकातीलही पात्रांच्या तोंडी असलेल्या वाक्यांवर शाळा प्रशासनाने आक्षेप घेतला आहे.
स्काऊट आणि जेमी या बहिण भावांची ही कथा आहे. टॉमबॉय असलेल्या स्काऊटच्या वडलांना ते एका श्वेतवर्णीय बाईवर झालेल्या बलात्काराच्या आरोपीचे वकीलपत्र घेतल्यानंतर त्यांना शहरातील श्वेतवर्णीयांकडून त्रास दिला जातो. स्काऊट आणि जेमीलाही त्याचा फटका बसतो. शेजारी पाजारी, शाळेतील सहविद्यार्थी वगैरे सगळीकडे त्यांना निगर लव्हर म्हणून हिणवले जाते. वास्तवदर्शी अंगाने जाणारे हे संवाद अंगावर येतात. मात्र कला म्हणजे त्या त्या काळातील समाजशास्त्रीय नोंदीच तर असतात. गोरख पांडेय म्हणतात तसं कला केवळ कलेसाठी असावी, जशी भाकरी ही भाकरीसाठीच असावी खाण्यासाठी नसावी… असं असत नाही, असं असू शकत नाही. मात्र बौद्धिकदृष्ट्या पुढे चालण्याऐवजी पाठीकडे चालणाऱ्या जगभरातील लोकांनी हे एक नवं तंत्र आत्मसात केलं आहे. ज्या कथा, कादंबऱ्या, कवितांनी जगभरातील लोकांच्या मनाची कवाडं उघडी केली, नेमक्या त्याच साहित्यावर अश्लीलतेचे आरोप ठेवून त्यावर बंदी घालायची. अमेरिकेसारख्या देशात याचा तीव्र विरोध तरी होतो. याचे कारण एखाद दोन वर्षे नव्हे तर अमेरिकेत पिढ्याच्या पिढ्या शाळेतच टू किल अ मॉकिंग बर्ड वाचून पुढे तयार झालेल्या आहेत. त्यामुळे अगदी उजव्या वळणाच्या रिपब्लिकन पक्षातूनही या असल्या निर्णयाला ठाम विरोध होतो. भारतात मात्र याच्या विपरितच सगळ्या गोष्टी घडत होत्या व आता त्या फार वेगाने घडत आहेत. तुकोबांच्या अभंगातले जे शब्द सदाशीवपेठी भाषेला पचले नाहीत, ते शब्दच बदलण्याचा अगोचरपणा मराठीतील भाषाप्रभूंनी केला आहे. म्हणून तर भले तरी देऊ गांडीची लंगोटी ही पुढे कासेची झाली. तुकोबांच्या अभंगातील शब्द बदलण्याइतकी मस्ती असलेल्या या जात-वर्गाच्या हातातच सध्या सत्तेच्या नाड्या असल्यामुळे इतिहासापासून साहित्यापर्यंत जे जे काही अक्षर वाङ्मय आहे ते ते संपविण्याचा उद्योग सुरू आहे. म्हणूनतर अवतारसिंग पाशची कविता ११वीच्या अभ्यासक्रमातून काढण्याचा निर्णय घेतला जातो आणि त्यावर ब्रही उमटत नाही. अमेरिकेत आठवीच्या विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमात बदल झाला तर लेखक, सिनेजगत, विचारवंत, पालक, सामान्य नागरिक सगळ्यांकडून त्याच्या विरोधात बोंब मारली जाते. आपल्याकडेही ती मारली जाते, मात्र त्याचा आवाज खूपच क्षीण आहे. पाशसारखा कवी देशात किती जणांना माहित आहे? पाशच काय रवींद्रनाथ टागोरांवरदेखील बंदी आणण्याचा सल्ला दिनानाथ बात्रासारख्यांनी देऊन ठेवलेलाच आहे. मात्र लोकप्रतिनिधींपासून ते या देशातील सगळ्याच क्षेत्रातील शहाण्यालोकांमधून तरी याव प्रतिक्रिया उमटावी हीदेखील अपेक्षा सध्या खूप मोठी वाटत राहते. एकतर सध्या सत्तेवर बसलेल्यांची अनेकांना भिती वाटत असावी. तशी भिती ट्रम्प नावाच्या व्यक्तीची अमेरिकी नागरिकांना वाटत नाही. याचे कारण लोकशाहीच्या काही मूलभूत संकल्पना विस्कळित होणार नाहीत, याची काळजी त्यांनी देश घडवताना घेतली आहे. भारतात फॅसिजम किंवा हुकुमशाहीचे मतितार्थच फारसे कोणी गांभीर्याने समजून घेतलेले नाहीत व आजही ते घेताना दिसत नाहीत. त्यामुळेच तर भारतीय जनसंघ असो की सध्याच्या भाजप त्यांच्यासोबत राजकीय युत्या करताना स्वतःला सेक्युलर म्हणवून घेणाऱ्या पक्षांना यत्किंचितही लाज वाटत नाही. लव्ह जिहादसारखी संकल्पना परिवाराकडून जनमानसात रुजवली जाते. इतकी की, त्याबाबतीत एनआयएने शोध घ्यावा, असे न्यायसंस्थेलाही वाटू लागते. अमेरिकेत मात्र अगदी खालच्या स्तरावरील न्यायालयातील निर्णयही राष्ट्रपती ट्रम्प यांच्या विरोधात जातात. अमेरिकी राष्ट्रपती हा आजच्या काळातील खरंतर जगाचा अनभिषिक्त सम्राटच असतो. मात्र त्यांच्या स्वतःच्या देशात तो लोकशाही मूल्यांना इतका बांधील असतो की ट्रम्पसारख्या व्यक्तीलाही त्यात फारसे काही करता येत नाही.
तिथली प्रसारमाध्यमे व्हाईटहाऊसमधील पत्रकार परिषदेत ज्या प्रकारचे प्रश्न विचारतात तितकी हिम्मत तर सध्याची प्रसारमाध्यमे भाजपच्या जिल्हाध्यक्षांना किंवा राज्यातील प्रवक्त्यांनाही विचारताना दाखवत नाहीत. मोदी आणि अमित शहा हे तर सोडाच. त्यामुळेच अमेरिकेत टू किल अ मॉकिंग बर्डवर आलेली बंदी ही जगभरातच उदारमतवादासमोर उभ्या राहणाऱ्या आव्हानांचा एक भाग असला तरी, ते आव्हान अमेरिकी समाज पेलून नेऊ शकतो. कारण वर्णद्वेष, धर्मद्वेष, वर्गीय शोषण हे सारे काही अमेरिकेत आहे आणि प्रचंड प्रमाणात आहे. मात्र तिथल्या समाजमनाच्या नेणीवेत लोकशाही मूल्यांची ठिणगी कायम जिवंत असते, हे नाकारता येत नाही. त्यामुळेच अमेरिकी नागरिकांनी ट्रम्प यांना मतदान करून निवडून दिल्या दिल्याच त्यांच्या विरोधात लाखोंचे मोर्चे निघतात. तिथली प्रसारमाध्यमे उघडउघड ट्रम्प यांच्या लोकशाहीविरोधी आणि वर्णद्वेषी भूमिकांच्या विरोधात ठामपणे उभी राहतात. भारतात मात्र नेमका याचाच अभाव आहे. त्यामुळेच मिसीसीपीमधल्या एका शहरात ली यांचे पुस्तक अभ्यासक्रमातून वगळणे आणि भारतात पाशपासून ते रविंद्रनाथ यांच्यापर्यंत बंदी येणे ताजमहालला पर्यटकांच्या यादीतून वगळणे यात जमीन अस्मानाचा फरक हा केलाच पाहिजे.

Sunday, 18 February 2018

74 मराठी भाषा आणि मराठी संमेलने..

"९१ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन, बडोदे" गुजरात येते आज सांगता होत आहे. त्यानिमित्ताने....
येणारे / होणारे जे साहित्य संमेलन आहेत ते नियोजन कर्ते / आयोजन कर्ते / साहित्य संमलेन मधील सदस्य आणि त्यासंबधीत इतर प्रतिष्ठित / आदरणीय सर्वाना सांगू इच्छितो... 

काही महत्वाची थोडीच प्रश्ने तुमच्यासाठी
ह्यापुढच्या साहित्य संमेलनापासून तुम्हाला उत्तरे द्यायची आहेत....

ह्या गेल्या १० वर्षात मराठी भाषा कुठे गेली याची उत्तरे तर हवी आहेत..  

९१ जाऊदे शेवटच्या १० संमेलनात काय काय झालं ? हे माहित आहे का ?
मराठी साहित्य, शिक्षण, मनोरंजन आणि संवाद क्षेत्र खूप वाईट / दयनीय आणि कुपोषित झालं आहे हे तुम्हाला का माहित नाही ? त्यावर काय करत तुम्ही ?

सरकार आश्वासन देत राहीन कामे करणार नाही पण बाकीची ताकत जी आहे आपल्या राज्याची ती कधी वापरात आणणार ? युवा पिढीची ताकत ?

तुमचं कार्याचा दिंडोरा तुम्ही पेटवता... कधी माध्यमिक शाळेचा अभ्यास केला आहे का स्वतःच्या भाषेबद्धल ?
कधी तमिळनाडू प्रांताचा अभ्यास केला आहे का ?

आकडे / अंक कधीही खोटं बोलत नाहीत. मातृभाषा किती वर्षात खालावली याच अनुमान तुम्हाला आहे का ?
भाषेचं मरण म्हणजे लोकसंस्कृतीच मरण आहे हे तुम्हाला माहित आहे का ?

पंतप्रधान कार्यलयात १ लाख पत्रे पाठवून काय सिद्ध केलं कि आम्ही मराठी भाषा प्रेमी / कट्टरपणा आहोत ?
तामिळ लर्निग ऍक्ट / मल्याळम लर्निग ऍक्ट लागू होऊन खूप वर्षे झाली "मराठी लर्निग ऍक्ट" कधी लागू होणार सर ?

मराठी भाषा संवर्धन / वाढीसाठी / जास्ती जास्त वापरासाठी उपाय पसरण्यासाठी उपाय काय आहेत ?
तुमचा / आपला रेडिओ ( आकाशवाणी ) एक प्रबोधन कार्यक्षेत्र असणारा घटक काय काम करत आहे आपल्या भाषेसाठी तुम्हाला माहित आहे का ?

आज मोठ्या शहरात मराठी भाषा वापरणारे अडाणी समजतात / माझाही मुंबईत तिरस्कार झाला जेव्हा काही इंगजी शब्द मला माहित नव्हते म्हणून.. हे का घडत आहे महानगरीत ??

बहुतांशी पालक मुलाला इंग्रजी शाळेत प्रवेश घेण्यासाठी का हट्ट करत आहेत ? त्यावर उपाय ? 
मराठी भाषा द्वेष / समस्यांचा / संपुष्टात / कमी वापराचा  राक्षस विनाश करत आहे त्यासाठी उठा तयारीला लागा...

विनोद तावडे विनोद म्हणतात "मराठीची सक्ती नको", मुख्यमंत्री हिंदीतून' भाषण करतात... इथेच ह्यांना चपराक बसवण्यासाठी पण उपाय हवेत"
अशी अजून बरीच प्रश्ने माझ्याकडे आहेत. आम्ही गप्प बसणार नाही.. आमची पिढी वेगळी आहे... अरे "अभिजात दर्जा" साठी लढता तुम्ही .. स्वतःच अस्तित्वसाठी कळकळ व्यक्त करता.... तेवढी ताकत तुम्ही गमावला आहात..! का सांगा बघू ??? अहो ९१ परिषद झाल्या "आम्ही आमचं कार्य केलं..." कार्याचा आढावा असेल मोठ्ठा पण बहिररूपी चित्र बदललं आहे.

झालय कस माहित आहे का ? आमच्या वयोमानातील पिढी सगळी "सोशल नेट्वर्किंग आणि इंटरनेट" मुळे अविचरणीय ( ह्या बाबतीत कमी प्रगल्भची ) झाली आहे त्यामुळे काय? कुठे? आणि का? चालू आहे माहित नाही. पण जे खरच पुढाकार घेतील ते बलाढ्य लेखणीने आणि ज्ञानाने चळवळ करतील.
मी किंवा आम्ही आता नवीन भावी लेखक / साहित्यिक या नात्याने पुढाकार घेऊन आमूलाग्र बदल घडवण्यास आणि आमची भाषा पुन्हा मरणाच्या घाटातून आणण्यास कटिबद्ध आहोत.. आम्ही युवा पिढी सज्ज होत आहोत, आमची भाषा जगवण्यास..  नव्या हालचाली होत आहेत.

"मायबोली मराठी भाषा जपण्यासाठी वाढवण्यासाठी मदत करा भावांनो "

'आकाश आलुगडे', १८/२/२०१८ " आपली मराठी भाषा आणि मराठी संमेलने"

73 स्मशानभूमी सफर १५ फेब्रुवारी

" स्मशानभूमी सफर १५ फेब्रुवारी  "

नदीवरच्या त्या "महाकाय" ठिकाणी आज पुन्हा वाट वाकडी करून स्वच्छन्दपणे आणि मनसोक्तपणे 'तो क्षण' आत्मसाद  करण्यासाठी सफर / भटकंती केली.  ह्या वयात ज्याचपण आकर्षण येत त्याच्या खूप आहारी जावं लागत असं वय झालं आहे हे जणू काही... का ! माहित पण आज खूप आकर्षित झालो होतो ह्या स्मशानभूमीसाठी.. म्हणून पुस्तक सोबत घेऊन वाचन , चिंतन, मन एकाग्र आणि एकांतात थोडा वेळ काढण्यासाठी मी आणि माझा मित्र तिथे गेलो होतो. जस जस आत जात होतो तस तस मन स्वतःला सावरत वेगळ्याच बंधनात जात होत.

  अमावस्याचा दिवस आणि दुपारचे १२ वाजून गेलेले जेव्हा तिथे पोहचलो. उन्हाचा पारा वाढत होता पण तिथे शांतता आणि थंड वारे वाहत होते. नदीवरचे पाणी शांत निखळ वाहत होतेच. स्मशानभूमीत ४ मढी जळून खाक झालेली. एक मढ जळत होतच , शेणकुटे थोडी जळायची राहिलेली.. त्याचा धूर होताच..  पण इतका नव्हता, आजूबाजूला ५ -६ कुत्री येऊन बसली होती. बहुधा मातीच्यावेळी कुत्र्यांचं प्रमाण जास्त असत पण आज एकही माती नव्हती. आजूबाजूचा परिसर आतून बाहेरून मी फिरत होतो. मला काहीतरी हवं होत, काही तरी तिथे आहे अशी आतून जाणीव येत होती. मन तळमळत होत कि, इथे काहीतरी आहे जे खूप मनाला / विचारला / आतील चैत्यनेला भावले आहे. जसा जसा वेळ जात होता तस तस हृदय घट्ट होत होतं. मागच्या वेळी रात्री मी इथे तो प्रयोग करण्यासाठी आलो होतो त्याच ठिकाणी पुस्तक वाचन करण्यासाठी मी बसलो. पुस्तकाची काही पाने वाचून झाली आतमध्ये दोन ठिकाणी लाकडे आणून ठेवली होती. ( पुढच्या मयताच्या तयारीसाठी...) तिथे जाऊन मी बसलो. मनात अनेक विचार येत होते. "जन्माला आलेल्या प्रत्येकाला इथे मरावं लागणार आहे." माझे आंतरिक पैलू मला खूप काही शिकवत होते. खरंच शब्दात व्यक्त करणे अवघड असतात काही क्षण....! ज्याला जगण्याचा खरच हेतू माहित आहे तो कशाही प्रकारे जगू शकतो... हो ना ?

हे माझं 'सहा फूट तीन इंचीच शरीर' सुद्धा इथेच जाळलं जाणार आहे हे माझं मन स्वीकारत नव्हतं. कोणाचा मृत्यू कधी होईल कसा होईल माहिती नाही. कोणालाही माहित नसत कोण, कसं, कुठे, कधी, कश्याप्रकारे, कोणत्या स्थितीत जीव गमावेल आणि ह्या अमूल्य जीवनाचा अंतः होऊन सर्वस्वी त्याग करेल. तरी सुद्धा आपण मानव हे स्वीकारू का शकत नाही कि आपण एकदिवस नक्की हे जग सोडून जाऊ... आयुष्याचा अर्थ त्याचे प्रयोजन हे सारे समजून घेणे कदाचित माणसाच्या 'सीमित बुद्धीच्या पलीकडचे' असेल. तुम्हाला व्यक्तिशः अनुभवांती सांगतो ज्याला आत्महत्या करावीशी वाटते  किंवा आयुष्याची किंमत माहित करून घ्यावीशी वाटते त्याने त्यांच्या  स्मशानभूमीत जाऊन थोडा वेळ जाऊन चिंतन / विचार करून फेर फटका मारून यावा.तिथे त्या व्यक्तीने थोडा वेळ द्यावा स्वतःला.. त्यामुळे खूप बदल होतील विचारात आणि मनाच्या दृष्टीकोनात.. मी सुद्धा आत्महत्या ह्या विषयावर खूप लांबवर जाऊन आलेलो आहे.

जीवन क्षण भंगुर आहे. त्याचा आस्वाद घ्यायला शिका. आहे त्या परिस्थिती / वातावरणात / व्यक्तींच्यात खूप काही दडले आहे ते शोधा. महत्वाचं म्हणजे वेगळा विचार करायला शिका.

माझं महत्वाचं वाक्य लेख लिहताना आठवलं - " काय नसतंय रे.. आयुष्य अगोदर बारक हाय"

नंतर मी माझ्या मित्रासोबत तिथे गप्पा मारत पुस्तक वाचत होतो. तो तिथे आयुष्यात पहिल्यांदा आला होता, तो खूप भावनिक झाला होता, त्याच्यासाठी सर्व काही वेगळं होत ते.. त्यांच्या समाजात "जमिनीत पुरलं" जातं.
तो मला सांगत होता  "आयुष्यात काहीही शेवट पर्यंत नसतं "
"आपण सगळे सोडून जाणार आहोत. तरीही लोक असे का वागतात ?" 

बोलता बोलता आमच्या पाठीमागे ते शेवटचं मढ जळत असताना आवाज चालू झाला.. 'तो चर - चर आवाज' विचित्र वाटला असेल माझ्या मित्राला..! आम्ही दोघे वळून मागे एकदम पहिले.

"हे बघ आता पूर्ण जळून संपेल आता, शेवटचे काही तुकडे राहिले आहेत" मी म्हणालो.

"हा आवाज कसला ?" तो म्हणाला.

"हाडे किंवा चरबी शेवटची जळताना असा आवाज येतो.." मी म्हणालो.

अगदी तीन ते चार फुटावर आम्ही बसलो होतो पाठ फिरवून... नजर गेली तर बांगड्या बाजूला होत्या राखेत.. त्या वरून माहित झालं कि नक्कीच स्त्रीच शरीर असेल हे..
( फोटोमध्ये मी अंगठा दाखवतांचा फोटो आहे बघू शकता )

"जस कि सुख दुःख, आणि अनमोल आयुष्य आपल्या ह्या प्रवासाचा भाग आहे तस हा मृत्यू देखील आपल्या आयुष्याचा एक अविभाज्य घटक आहे रे" मी म्हणालो.

"हो.. बरोबर! तरी सुद्धा आपण आपलं भविष्य पुढे चांगलं घडेल या अपेक्षेने जगत असतो" तो म्हणाला'

आमच्या गप्पा अर्धा तास चालल्या होत्या. त्याच्या भावना कळकळ व्यक्त करत होत्या. मी त्याला समज देत होतो. खूप काही तिथे गेल्यावर शिकायला / अनुभवयास मिळाले. कदाचित तो मला इथे आणेलही "शेवटी"... !
त्याला हे आठवेल सर्व काही..!. तुमच्यापैकी हा लेख वाचणारे खूप जण तिथे माझ्यासाठी तिथे येतील हे मी खात्रीने सांगू शकतो.

स्मशानभूमीच्या अनुभवामुळे माझं मानसिक आरोग्य वेगळ्या आणि उच्च नैतिकतेला गेलं असं मला जाणवलं. खर म्हणजे तुम्हीही तिथे जाऊन यायला पाहिजे. "तुमच्या आयुष्यतील शेवटचं ठिकाण आहे ते..."

नंतर मी माझ्या मित्राला बाहेर पाठवले, आतमध्ये जाऊन आणखीन फिरून थोड्या सेल्फी काढल्या. सेल्फी काढत असताना एक कावळा तिथे ओरडत होता. मला त्याला दगड मारायची इच्छा झाली पण तस केलं नाही. कावळा आणि डुक्कर दोन प्राणी विचित्र आहेत. मला त्यांच्यावर पुढे अभ्यास करायचा आहे. जाता जाता स्मशानभूमीतला तो "स्वामी हा व्यक्ती" भेटला. त्या पात्रावर मी पुढच्या महिन्यात लेख लिहिनच.

आतापर्यंत जीवनात खूप अनुभव अनुभवयास मिळत आहेत ते वेगळी कृती केल्यामुळेच, वेगळं काही करायचं असेल तर पहिल्यांदा विचार वेगळा करता आला पाहिजे आणि त्यासाठी तशी संगत आणि इच्छा हि आत्मसाद करावयास हवी. सुख दुःख / श्रीमंत गरीब / उच्च निच्च / जात धर्म ह्या गोष्टी क्षुल्लक आहेत याची जाणीव होते इथे येऊन. प्रत्येकाला सुख हवं आहे पण कस मिळवायचं ते माहिती नाही, काही जणांना माहीत असून ते करत नाहीत.

शेवटी जाता जाता सांगू इच्छितो " आयुष्य खरंच खूप लहान आहे, जगण्याची कला सोपी आहे पण अशक्य नाही.
अडथळे येतील जातील स्वतः किती महत्वाचे यावर सर्व अबलंबवून, ह्या जगण्याचा आनंद आणि आस्वाद घेत ह्या जगात मनसोक्त बागडायला शिका. लेखसोबत तिथे छायाचित्रण / फोटो काढले ते मी इथे पोस्ट करत आहे.


" सुखी होण्यासाठी माणसाकडे कारण असावे लागते मात्र एकदा का ते कारण गवसले कि माणूस आपोआप सुखी होतो. माणूस सुखाच्या शोधात नसतो तर ज्यायोगे सुख मिळेल अश्या  कारणांच्या शोधात असतो समोर थकलेल्या परिस्थितीत अर्थ बदलून व त्या क्षणातील संभाव्यता जाणून प्रत्यक्षात आणल्यास माणसाला सुख मिळते. - व्हिक्टर फ्रॅन्कल"


आकाश आलुगडे, " स्मशानभूमी सफर १५ फेब्रुवारी  " १५ /२/ २०१८ इचलकरंजी

Monday, 1 January 2018

71 पुस्तके वाचा

१ ) "चिंता सोडा सुखाने जगा - डेल कार्नेजी"
२ ) "स्वयंशिस्तीची शक्ती - ब्रायन ट्रेसी"
हि दोन पुस्तके मागच्या आठवड्यात वाचून झाली, दोन्ही अनुवादित पुस्तकांबद्धल बोलावं तेवढं कमीच आहे. हे दोन्ही हि लेखक माझे आवडत्या लेखकांपैकी एक आहेत.
'चिंता सोडा सुखाने जगा - डेल कार्नेजी' ह्या पुस्तकात त्याच्या आयुष्यभराचा अभ्यासाचा दृष्टिकोन मांडला आहे , आयुष्य मजेशीर बाजू कशी बघावी , चिंता मुक्ततेसाठी उपाय , उदाहरणासहित स्पष्टीकरण आणि स्वअभ्यासक्रमी त्यांनी दिला आहे. हा एकप्रकारचा आजीवन अभ्यासक्रम म्हणायला हरकत नाही.
जे सतत काळजीत असतात , नकोश्या भावनेत वागत असतात, नैराश्यमध्ये असतात किंवा चिंतेत असतात त्यांनी हे पुस्तक नेहमी सोबत ठेवावं आणि वाचावं. ह्यपासून सुटका आणि मुक्ती नक्की मिळते.
'स्वयंशिस्तीची शक्ती - ब्रायन ट्रेसी' हे पुस्तक अफलातून आणि मजेदार आहे. अफाट प्रेरणा तर देतच त्याबरोबर हे वाचत असताना एक प्रवाह होतो त्यानुसार आपण कृती/ जडण घडण करतो. ब्रायन ट्रेसी ह्यांनी स्वयंशिस्तचा पूर्ण आढावा घेत टप्प्या टप्प्यात मत मांडले आहे, ज्या यावेळी आपल्याला जे काम करणे गरजेचे आणि त्या वेळी आपण ते काम करतो त्या वेळेला स्वयंशिस्त म्हणतात. हे पुस्तक सुद्धा नेहमी सोबत ठेवण्यासारखं आहे, जगातील नामवंत व्यक्तीचा त्यांनी उदाहरणाद्वारे उल्लेख करत त्याच्या सवयी आणि त्यापासून होणारे फायदे याचा आढाव घेतला आहे. आजच्या युवकांसाठी हे पुस्तक खूप उपयोगी पडेल.
दोन्ही पुस्तके चेतन कोल्हापुरे ह्या माझ्या वर्गमित्राने मला दिली आहेत. आमची पुस्तक देवाण घेवाण चालूच असते.
तुम्हीही अशीच पुस्तके वाचा आणि तुमचं जीवन समृद्ध करा.🤘
भारत देशात अशी पुस्तके तयार होत नाहीत, लिहली जात नाहीत आणि होणारही नाहीत म्हणून मी अनुवादित पुस्तके वाचतो.
आकाश आलुगडे | पुस्तके वाचा | ३० डिसेम्बर २०१७ 😊